Tuesday, 22 April 2014

# Day 00

आजपासून ही माझी नवी डायरी, ऑनलाईन डायरी...

आज जय फायनली अमेरिकेला गेला... इतके दिवस इतके  महिने इतके वर्ष त्याने हे स्वप्न नुसतं “पाहिलं” नव्हतं, तर पुन्हा पुन्हा जपून ठेवलेलं पत्र काढून वाचावं तसं पुन्हा पुन्हा बाहेर काढून हाताळलं होतं... वाचलं होतं- आज तो फायनली अमेरिकेला गेला... रडून बिडून कालच झाल्यामुळे आज सुदैवाने हसून छान बाय केलं- कितीही प्रयत्न केला त्याची मिठी मनात साठवून ठेवायचा तरी तो लांब झाला की त्या स्पर्शाची आठवण पुसली जाणार हे माहित होतं. कुण्या लेखकाने खूप सुंदर लिहून ठेवलंय- “स्पर्श म्हणजे नदीच्या पाण्यात काठी रोवून केलेला खळगा असतो फक्त- काठी काढली की खळगा गायब... ना त्या समोरच्या पाण्यावर तो दिसत, ना प्रत्यक्ष ज्या पाण्यात केला होता त्यावर- ते तर केव्हाच वाहतं होऊन गेलं पण असतं पुढे... बस  काठी दिसते ओलसर... तेवढाच काय तो पुरावा....”
४६ दिवस आहेत- आणि त्यांना पुरून उरतील इतकी कामं. खरंच जय नसला की शांतपणे उरक होतो कामाचा... एरव्ही मन सतत त्याच्यापाशी कुत्र्याच्या पिल्लासारखं घोटाळत राहतं- कामं पारोशी राहतात. हिरमुसतात- धूळ जमा होते त्यावर- आता तसं होणार नाही- बहुदा... व्यवधानं काय कमी असतात का? म्हणजे जय केवळ एक व्यवधान? नाही नाही- तो तर सगळं व्यापून टाकणारा अवकाश आहे- जे काय घडतं ते म्हणूनच त्याच्या सोबतीने त्याच्या सहवासात- आता तो नाही तरी गोष्टी थांबणार नाहीत- पण जसं मी एक कविता लिहिली होती फार पूर्वी-
 साखर नसलेला चहा प्यायल्यावर,
उशी नसताना झोपल्यावर,
बिनवासाचं फुल हाती आल्यावर
फेस नसलेला साबण वापरल्यावर
कसं वाटतं???????????????
बस्स,,,, आत्ता तसंच वाटतंय तू सोबत नसल्यावर....
.....
..............आता खरंच तसं वाटतंय... मिस यु जय...नीट जा.. live your dream... bon voyage!





No comments:

Post a Comment